गोंडपिपरीत सीडीसीसी बँकेच्या सहकार सप्ताहातून आर्थिक योजनांसह सामाजिक सुरक्षा योजनांची जनजागृती
सहकार महर्षी बाबासाहेब वासाडे यांच्या स्मृतींना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
सहकार क्षेत्राच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्यभर योगदान देणारे सहकार महर्षी कै. बाबासाहेब वासाडे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा गोंडपिपरीच्या वतीने शनिवार, दि. १९ सप्टेंबर शनिवारी सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांशी थेट संवाद साधत बँकेच्या विविध कर्ज व बचत योजनांसोबतच सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली.
“सहकारातून आर्थिक सुरक्षितता आणि सुरक्षित भविष्यासाठी नियोजन” हा संदेश देत नागरिकांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुवर्ण कर्ज,चारचाकी वाहन कर्ज, मालमत्ता तारण कर्ज,महिला बचत गट कर्ज, गृहकर्ज, महिलांसाठी विशेष सुलभ कर्ज योजना तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी सुलभ कर्ज योजना आदी सुविधांची माहिती यावेळी देण्यात आली.
यासोबतच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या सामाजिक सुरक्षा योजनांचे महत्त्वही नागरिकांना समजावून सांगण्यात आले. पात्र खातेदारांना वार्षिक रु. ४३६ प्रीमियममध्ये दोन लाखांचे जीवन विमा संरक्षण मिळते, ही योजना १८ ते ५० वर्षे वयोगटासाठी आहे. तर ही वार्षिक केवळ रु. २० प्रीमियमची अपघात विमा योजना असून,अपघाती मृत्यू किंवा नियमानुसार कायमस्वरूपी अपंगत्वाच्या परिस्थितीत २ लाखांपर्यंत संरक्षण मिळते. ही योजना १८ ते ७० वर्षे वयोगटासाठी आहे. दोन्ही योजना घेतल्यास वार्षिक एकूण रु. ४५६ खर्चात दोन्ही प्रकारचे संरक्षण मिळू शकते. अपघाती मृत्यूच्या परिस्थितीत दोन्ही योजनांच्या पात्रतेनुसार एकूण ४ लाखांपर्यंत लाभ मिळू शकतो.
“पैसा गेला तर पुन्हा कमावता येतो; पण कुटुंबाचा आधार गेला तर?” या संदेशातून सामाजिक सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सहकार महर्षी बाबासाहेब वासाडे यांच्या विचारांना अभिवादन करत, आर्थिक नियोजन आणि सामाजिक सुरक्षिततेचा संदेश बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव आवेश पठाण, संचालक तथा राजुरा विभागीय कर्ज समिती अध्यक्ष उल्हास करपे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरीत विविध योजना सहकार सप्ताहातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
गोंडपिपरी शाखा अधिकारी वाय.एस धोतरे, रोखपाल विरूटकर, लिपिक साजन माडूरवार, मनोज मेश्राम, हर्षल चिमुरकर, स्वप्नील ढवस, निरीक्षक राकेश मेश्राम, रोशन भोयर, शुभांगी निमगडे, किरण नगारे समस्त संचालक मंडळ आणि राजुरा विभागीय अधिकारी यांनी सहकार सप्ताह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.



