गणेशोत्सवात डाक विभागाच्या विविध योजनांची जनजागृती
सुकन्या समृद्धी योजना व इतर योजनांची माहिती ; माहिती व जनसंपर्कचा लोकसंवाद कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : भारतीय डाक विभागामार्फत विविध जनकल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. त्याची जनजागृती होण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत गणेशोत्सवात लोकसंवादाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. वर्धा शहरातील केळकरवाडी येथील केळकरवाडीचा राजा मंडळात विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून योजना समजावून सांगितल्या व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
आर्थिक सक्षमीकरण व आर्थिक समावेशन या केंद्र सरकारच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डाक विभागामार्फत विविध बचत योजना व नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डाक विभागामार्फत बचत खाते, आवर्ती खाते, सुकन्या समृद्धी योजना, मुदत ठेव खाते, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, वरिष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तसेच डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत.
सुरक्षित व खात्रीशीर बचतीसाठी नागरिकांचा डाक विभागाच्या योजनांकडे कल वाढत आहे.
सध्या गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून, या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात. या संधीचा उपयोग करून नागरिकांपर्यंत विविध योजना व सेवा पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय व वर्धा डाक विभागामार्फत गणेशोत्सवाच्या कालावधीत विशेष लोकसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये नागरिकांना डाक विभागाच्या विविध बचत योजना व डाक जीवन विमा, ग्रामीण डाक जीवन विमा, आधार अद्ययावत करणे, मोबाईल/आधार लिंकिंग तसेच इतर नागरिकाभिमुख सेवांची माहिती देण्यात आली.
लोकसंवाद कार्यक्रम सायंकाळी गर्दीच्या व नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना, सेवा ग्रामीण व शहरी भागातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या शिबिरास भारतीय डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रसाद लहाने, राहुल उरकांदे, सपना धोटे, स्वप्नील जिकार, श्याम वानखेडे, आश्लेषा नागपूरकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे, सोमनाथ सुरकुटे तसेच श्री बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष विशाल वानखेडे, विक्रांत मोगरकर, अर्जुन राजूरकर, अनिल फत्तेपूरीया, दिपक जोशी, सौरभ वाघ, वैभव भांडेकर, प्रथमेश ढोले, नैतिक हेडाऊ, राम गोस्वामी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



