ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुक्यात पारंपरिक बैलपोळा उत्साहात : कॅटरर्स, डेकोरेशन्स अँड साऊंड असोसिएशनचे आयोजन

आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनात भाजपा तर्फे शेतकऱ्यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती तालुका कॅटरर्स, डेकोरेशन्स अँड साऊंड असोसिएशनच्या प्रमुख आयोजनातून तसेच आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. भद्रनाग मंदिर परिसरासह गवराळा येथील सूर्यमुखी हनुमान मंदिर परिसरात तसेच भद्रावती शहरातील विविध ठिकाणी बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. याचबरोबर शहरातील विविध भागांत तान्हा पोळाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक मानला जातो. वर्षभर शेतकऱ्याच्या शेतीकामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या पार्श्वभूमीवर बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून, त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. बैलांच्या अंगावर विविध रंगांची नक्षी, गोंडे, झूल आणि आकर्षक सजावट करण्यात आल्याने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.

भद्रनाग देवस्थान, गवराळा येथील सूर्यमुखी हनुमान मंदिर परिसर तसेच शहरातील विविध ठिकाणी शेतकरी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या पोळा उत्सवामुळे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडले.

दरम्यान, यांत्रिकीकरणामुळे शेतीतील बैलांचे महत्त्व कमी होत असल्याची खंत ज्येष्ठ आनंदराव पाटील बदखल यांनी व्यक्त केली. पूर्वी बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानला जात असे. शेतीची मशागत, पेरणी, वाहतूक यांसह अनेक कामांमध्ये बैलांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. मात्र ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या वाढत्या वापरामुळे शेतीतील बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

त्यामुळे बैलपोळ्यासारख्या पारंपरिक सणांच्या माध्यमातून बैलांचे महत्त्व, शेतकरी आणि बैल यांच्यातील भावनिक नाते तसेच ग्रामीण शेतीसंस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत भद्रावती कॅटरर्स, डेकोरेशन अँड साऊंड असोसिएशन तसेच शेतीनिष्ठ ज्येष्ठांकडून व्यक्त करण्यात आले.

शहरातील विविध भागांत झालेल्या तान्हा पोळ्यात बालगोपालांनी सजविलेल्या छोटेखानी बैलजोड्यांसह सहभाग घेतल्याने उत्सवाला विशेष रंगत आली. पारंपरिक वेशभूषा, सजावट आणि पोळ्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमातून लहान मुलांना ग्रामीण परंपरेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये