झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ॲड. लखनसिंह कटरे यांची निवड
मूल येथे २८ व २९ नोव्हेंबरला रंगणार झाडीबोली साहित्याचा जागर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने येत्या २८ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मूल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक तथा निवृत्त जिल्हा निबंधक ॲड. लखनसिंह कटरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे झाडीबोली साहित्य चळवळीतील साहित्यिक व भाषाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ॲड. लखनसिंह कटरे हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते अधिवक्ता म्हणून कार्यरत असून साहित्य, भाषा, इतिहास, लोकसंस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कवी, कथाकार, निबंधकार, भाषाअभ्यासक आणि संशोधक म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी, हिंदी, झाडीबोली आणि पोवारी या भाषांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांचे २३ हून अधिक ग्रंथ व पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पोवारी व झाडीबोली या बोलीभाषांचे संशोधन, संवर्धन आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. ‘पोवारी साहित्य मंजूषा’, ‘पोवार समाज तथा पोवारी बोली : एक आकलन’, ‘एकोणिसावा अध्याय’ आणि ‘आडवळणावरील काही स्थानके’ हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांनी दोन पाठ्यपुस्तकांचे लेखनही केले आहे.
भारत सरकारच्या साहित्य अकादमी, नवी दिल्लीच्या मराठी भाषा सलाहकार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तसेच विविध साहित्यिक संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विद्यापीठाशी संबंधित उल्लेखनीय शंभर व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.
झाडीबोली ही केवळ संवादाची बोली नसून ती झाडीपट्टीच्या लोकजीवनाची, सांस्कृतिक परंपरेची आणि सामूहिक अस्मितेची वाहक आहे. या भाषेचे साहित्यिक वैभव जपणे, नव्या पिढीपर्यंत बोलीभाषेचा वारसा पोहोचविणे आणि लोकसाहित्याचे दस्तऐवजीकरण करणे या दृष्टीने त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक व संशोधनात्मक अनुभवाचा संमेलनाला लाभ होणार आहे.
अरुण झगडकर, अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूर



