बेकायदेशीर कॅरम क्लबवर भद्रावती पोलिसांची कारवाई
नागमंदिर परिसरातील पाझारे टी पॉईंटवर कारवाई : तीन कॅरम बोर्ड जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नागमंदिर परिसरातील ‘पाझारे टी पॉईंट’ दुकानाच्या मागील बाजूस पत्र्याचे शेड उभारून विनापरवाना कॅरम क्लब चालविल्याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तीन कॅरम बोर्ड जप्त करण्यात आले असून दुकान चालकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
दि. ११ सप्टेंबर रोजी भद्रावती पोलीस स्टेशनच्या पथकाला नागमंदिर परिसरात ‘पाझारे टी पॉईंट’चे मालक सम्यक प्रबुद्ध पाझारे (वय ३०, रा. शिवाजीनगर, भद्रावती) हे दुकानाच्या मागील बाजूस पत्र्याचे शेड उभारून नागरिकांना पैसे घेऊन कॅरम खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी पंचांसमक्ष सायंकाळी ६.५० वाजता सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये विजेच्या प्रकाशात तीन कॅरम बोर्डवर नागरिक सिंगल व डबल गेम खेळताना आढळून आले. दुकान चालकाकडे कॅरम क्लब चालविण्याबाबत परवान्याची विचारणा केली असता कोणताही शासकीय परवाना नसल्याचे समोर आले.
या कारवाईत ‘PRESIZE ELEGANT’ कंपनीचे तीन कॅरम बोर्ड, प्रत्येकी अंदाजे सात हजार रुपये किमतीचे, असा एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुकान चालकाविरुद्ध मपोका कलम ३३(१)(डब्ल्यू), १३१(१)(ब), ५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस स्टेशन भद्रावती येथील पो.हवा. प्रशांत पुंडलिक शेंदरे, पो.उप.नि. संतोष केदार, पो.हवा. गोपाल आतकुलवार व पो.हवा. देवानंद डुकरे यांच्या पथकाने केली.



