गडचांदूरला मिळाले गोंडवाना विद्यापीठ परीक्षा उत्तरपत्रिका संकलन केंद्र
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या मागणीला यश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना सीमेलगत असलेल्या गडचांदूर येथे विद्यापीठ परीक्षा उत्तरपत्रिका संकलन केंद्र सुरू करण्यात यावे, अशी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने सातत्याने मागणी केली होती.या यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन मुंगळे यांनी त्वरित परिपत्रक जारी करून गडचांदूर येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाला उत्तर पत्रिका संकलन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या भागातील परीक्षा केंद्र प्रमुखांनी आनंद व्यक्त केला आहे.गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे ,सचिव डॉ. विवेक गोरलावार,जेष्ठ पदाधिकारी प्राचार्य प्रकाश शेंडे, संघटनेचे विभाग समन्वयक डॉ.शरद बेलोरकर,प्रभारी प्राचार्य डॉ. गजानन राऊत, डॉ, विशाल मालेकर आणि इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती .
गडचांदूर येथे विद्यापीठ परीक्षा उत्तरपत्रिका संकलन केंद्र मान्य झाल्यामुळे गडचांदूर – राजुरा- कोरपना परिसरातील विदर्भ महाविद्यालय जिवती, राजीव गांधी महाविद्यालय पाटण, प्रभाकर मामुलकर महाविद्यालय कोरपना, शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा, महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूर, गुरुकुल महाविद्यालय नांदा फाटा ,शिवाजी महाराज महाविद्यालय चिंचोली अशा एकूण आठ परीक्षा केंद्रांना मोठा दिलासा मिळाला आहे . या पूर्वी या सर्व केंद्रावरील उत्तरपत्रिकांचे संकलन चंद्रपूर येथे करण्यात येत होते. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. उपरोक्त महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रापासून चंद्रपूर संकलन केंद्र हे 60 ते 95 किमी अंतरावर असल्याने गैरसोयीचे ठरत होते.
या संदर्भात गडचांदूर येथे उत्तरपत्रिका संकलन केंद्र करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील परीक्षा केंद्रावर कार्यरत मुख्य परीक्षाकेंद्र प्रमुखांनी यंग टीचर्स संघटनेकडे केली होती. सदर परिस्थिती व समस्या लक्षात घेता गडचांदूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे उत्तर पत्रिका संकलन केंद्र स्थापन करण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केली होती या मागणीला यश प्राप्त झाले असून संघटनेने गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे.



