अंतरगाव येथे कृषी विभागाच्या पुढाकाराने लोकसहभागातून वनराई बंधारा
वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याच्या पातळीत ४ ते ५ फुटांची वाढ ; जलसंधारणासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :- कृषी विभाग, सावली यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून अंतरगाव येथे नारायण महाराज मंदिरालगत असलेल्या मुख्य नाल्यावर वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे नाल्याच्या पाण्याची पातळी ४ ते ५ फुटांनी वाढली असून, जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची तसेच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने जलसंधारणासाठी पुढाकार घेतला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसाठी व जनावरांसाठी व्हावा, तसेच पाणीटंचाईच्या काळात पाण्याची उपलब्धता टिकून राहावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकरी गटांच्या सहकार्याने हा वनराई बंधारा उभारण्यात आला. गटशेतीमध्ये अग्रेसर असलेल्या शिवछत्रपती पुरुष बचत गटातील सर्व सदस्यांनी लोकसहभागातून या उपक्रमात सक्रिय योगदान दिले. सामूहिक श्रमदान आणि एकजुटीच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करता येतात, हे या उपक्रमातून दिसून आले.
वनराई बंधाऱ्यामुळे नाल्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत झाली असून, परिसरातील पाण्याच्या पातळीत ४ ते ५ फुटांची वाढ नोंदविण्यात आली. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच पशुधनासाठी होण्यास मदत होणार आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी गावागावांत अशा प्रकारचे उपक्रम राबविणे आवश्यक आहे.
या उपक्रमाच्या वेळी श्री. ललित राऊत (तालुका कृषी अधिकारी), श्री. वाय. डी. टेकाळे (सहाय्यक कृषी अधिकारी), श्री. ए. के. ठिकरे (कृषी सेवक), श्री. एन. डी. फुलबांधे (समूह सहाय्यक, पोकरा) आणि श्री. अरविंद नूतीलकंठावार (निमंत्रक), श्री.पुंडलिक घुबडे, श्री.नंदू झाडे यांच्यासह शिवछत्रपती पुरुष बचत गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.
कृषी विभाग, सावली यांच्या सौजन्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देण्यात आला. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केल्यास ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते. त्यामुळे अंतरगाव येथील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
ललीत राऊत,तालुका कृषी अधिकारी सावली.



