ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आठवडी बाजारात अवजड वाहतुकीचा बिनधास्त वावर!

बालकाच्या मृत्यूनंतरही प्रशासन निष्क्रिय : अवजड वाहतुकीला अभय कोणाचे?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           शहरात अवजड वाहनामुळे निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्यानंतर वाहतूक यंत्रणा सतर्क होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आज बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशीही वर्दळीच्या मार्गावर अवजड हायवा वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आठवडी बाजारामुळे शहरात नागरिक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी अवजड वाहनांची वाहतूक अपघातांना निमंत्रण देऊ शकते. दिवसा वर्दळीच्या वेळेत वाहतूक बंद करून ती रात्रीच्या वेळी करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

फुटपाथ आणि रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या दुकानांमुळे रस्ते अरुंद होतात. त्यात अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. वेगवान वाहने, अरुंद रस्ते आणि गर्दी यामुळे गंभीर अपघाताचा धोका वाढला आहे.

अवजड वाहतुकीला अभय कोणाचे?

अलीकडील दुर्घटनेनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने वाहतूक पोलिस आणि नगर परिषद प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी अवजड वाहनांना प्रवेशासंदर्भात कोणते नियम आहेत आणि त्यांची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. या प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाने आठवडी बाजाराच्या दिवशी वर्दळीच्या वेळेत अवजड वाहतुकीवर निर्बंध घालून निश्चित वेळापत्रक तयार करावे, अशी मागणी आहे. आणखी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल भद्रावतीकरांनी उपस्थित केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये