विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत : चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शासनाची रॉयल्टी न भरता विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अंदाजे सहा ब्रास रेती असा एकूण ४ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस पथक गस्तीवर असताना गवाराला परिसरात लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना आढळला. चालक विठ्ठल गुलाब गोखरे (वय ४०, रा. हनुमान नगर, भद्रावती) याच्याकडे रेती वाहतुकीचा अधिकृत परवाना किंवा रॉयल्टी पावती आढळून आली नाही. त्यामुळे पंचनामा करून ट्रॅक्टर-ट्रॉली (किंमत ४ लाख ५० हजार रुपये) आणि सहा ब्रास रेती (किंमत ६ हजार रुपये) जप्त करण्यात आली.
पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



