शहरातील मुख्य मार्गावरील जुनाट पथदिवे बदलण्याकडे दुर्लक्ष
दिव्याखालीच अंधार असल्याचे दृश्य : शहरातील नागरिकांचा प्रश्न?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दिवाळीच्या प्रकाशोत्सवाची तयारी सुरू असतानाच भद्रावती शहरातील मुख्य मार्ग, चौक आणि विविध प्रभागांमध्ये अपुऱ्या प्रकाशाची समस्या कायम आहे. विद्युत खांब आणि पथदिवे असूनही जुनाट व कमी प्रकाश देणाऱ्या पथदिव्यांमुळे ( बल्ब ) नागरिकांना रात्री अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे ‘दिव्याखालीच अंधार’ या म्हणीचा प्रत्यय येत असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्य मार्गावर अपघातांचा धोका
बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते रेल्वे स्टेशन या महत्त्वाच्या मार्गासह शहरातील विविध भागांत पुरेसा प्रकाश नसल्याच्या तक्रारी आहेत. अंधुक प्रकाशामुळे रस्त्यावरील जनावरे, खड्डे व अन्य अडथळे वेळेत दिसत नसल्याने दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिवाळीपूर्वी दुरुस्तीची मागणी
नगर परिषद प्रशासनाने शहरातील सर्व पथदिव्यांची तपासणी करून जुनाट व कमी प्रकाश देणारे पथदिवे ( बल्ब ) तातडीने बदलावेत. आवश्यक ठिकाणी एलईडी दिवे बसवून बंद पथदिव्यांची दुरुस्ती करावी, तसेच मुख्य मार्ग, चौक आणि विविध प्रभागांत पुरेसा प्रकाश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने किमान सणापूर्वी तरी शहरातील पथदिवे व्यवस्थित सुरू करून रस्ते प्रकाशमान करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे.



