धाबा पोलिसांकडून “हिट अँड रन”चा एका दिवसात छडा
तांत्रिक तपासाच्या मदतीने नागपुरातून आरोपी वाहनासह ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
धाबा ते सोमणपल्ली मार्गावर मॉर्निंग वॉक व रनिंग करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन ठार केल्याच्या प्रकरणाचा धाबा पोलिसांनी अवघ्या एका दिवसात छडा लावला. अपघातानंतर फरार झालेल्या वाहनचालकाला तांत्रिक तपासाच्या आधारे नागपूर येथून वाहनासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास धाबा ते सोमणपल्ली रोडवर विठ्ठल पाटील चौधरी यांच्या शेताजवळ मॉर्निंग वॉक व रनिंग करणारे विठ्ठल सुधाकर मोहुर्ले (वय २८, रा. धाबा) यांना एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे धडक दिली. या अपघातात मोहुर्ले गंभीर जखमी झाले. मात्र, वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी धाबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार व त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
धाबा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक मदतीच्या सहाय्याने तेलंगणा ते नागपूर असा माग काढत संशयित वाहनाचा शोध घेतला. अखेर या प्रकरणातील आरोपी संदीप संतोष शिंदे (वय २८, रा. वाडी, नागपूर) याला त्याच्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार, एएसआय आत्राम, पोह. जीवन आचेवार, पोशि. गजानन तुरेकर, धनु सयाम, अमित गुरनुले आणि मासूम मेश्राम यांनी महत्वाची भूमिका बजावली.
हिट अँड रनसारख्या गंभीर प्रकरणात आरोपींचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन त्याला वाहनासह ताब्यात घेतल्याने धाबा पोलिसांच्या तपास पथकाच्या कामगीरीचे कौतुक होत आहे.



