येरमियेसापूर येथे विद्यार्थ्यांनी अनुभवली नागरिक विज्ञानाची निसर्गशाळा
‘विस्डम वॉक’, पक्षी निरीक्षण व ‘सापांवर चर्चा’ उपक्रमातून स्थानिक जैवविविधतेची ओळख

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेविषयी कुतूहल, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने येरमियेसापूर येथे विविध नागरिक विज्ञान (Citizen Science) उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘विस्डम वॉक’, पक्षी निरीक्षण आणि ‘सापांवर चर्चा’ (Saanpo Pe Charcha) या उपक्रमांचा समावेश होता.
‘विस्डम वॉक’दरम्यान विद्यार्थ्यांना धरण परिसरात नेऊन स्थानिक वनस्पती व जैवविविधतेची ओळख करून देण्यात आली. पळस, बांबू, बोर आदी वनस्पतींची स्थानिक नावे, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या स्थानिक भाषेतील वनस्पतींची नावे आणि पारंपरिक उपयोग सांगत आपले स्थानिक पर्यावरणीय ज्ञान मांडले. यावेळी मशरूम तसेच फुलपाखरासाठी वापरल्या जाणाऱ्या स्थानिक गोंडी शब्द ‘पिपरी’ याबाबतही चर्चा झाली.
त्यानंतर तलाव परिसरात पक्षी निरीक्षणाचा उपक्रम घेण्यात आला. पक्षी म्हणजे काय, परिसंस्थेमध्ये त्यांचे महत्त्व आणि आकार, रंग, हालचाल तसेच आवाजाच्या आधारे पक्ष्यांची ओळख कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. Common Tailorbird च्या वैशिष्ट्यपूर्ण ‘चिवी-चिवी’ आवाजाचे उदाहरण देत पक्षी ओळखण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना दुर्बिणीचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
या पक्षी निरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी Painted Stork, Grey Heron, Little Cormorant, Indian Cormorant, Indian Grey Hornbill, Asian Green Bee-eater आणि Barn Swallow अशा एकूण सात पक्षी प्रजातींची नोंद केली.
पक्षी निरीक्षणानंतर ‘सापांवर चर्चा’ या उपक्रमातून सापांविषयी असलेले गैरसमज दूर करण्याबरोबरच परिसंस्थेतील त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विशेषतः शेतीच्या परिसंस्थेत सापांची भूमिका महत्त्वाची असून ते उंदीर व इतर कृंतकांची संख्या नियंत्रित करून पिकांचे आणि शेतजमिनीचे संरक्षण करण्यास हातभार लावतात, याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या स्थानिक भाषेतील सापांची नावेही उत्साहाने सांगितली.
या उपक्रमातून स्थानिक पर्यावरणीय ज्ञानाची सांगड नागरिक विज्ञानाशी घालण्यात आली. परिसरातील जैवविविधतेचे निरीक्षण करणे, प्रश्न विचारणे, नोंदी ठेवणे आणि स्थानिक निसर्ग समजून घेणे या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच निसर्ग संवर्धनाची भावना दृढ झाली.
हा उपक्रम फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी (FES) यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. स्थानिक समुदायांच्या सहभागातून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पुनरुज्जीवन आणि शाश्वत व्यवस्थापन यासाठी FES कार्यरत असून, नागरिक विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी व स्थानिक समुदायांना आपल्या परिसरातील जैवविविधतेचे निरीक्षण, दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी प्रोत्साहित केले जाते.
या उपक्रमाचे मार्गदर्शन अभिषेक पालीवाल, संतोष पंडित आणि सोयम सर यांनी केले. तसेच संतोष सलाम, केशवराव कुमरे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) आणि पियुष जावळे (शिक्षक) यांचे आयोजन व सहभागासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.



