गोंडपिंपरीत महिला उद्योगासाठी जागेचा प्रश्न सुटणार!
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रशासनाची सकारात्मक भूमिका.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महिलांची एकजूट, त्यांच्या कष्टाला उद्योगाची जोड आणि आर्थिक स्वावलंबनाचा ध्यास यामुळे गोंडपिंपरीत महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत. महिलांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून कार्यालय व भवन उभारणे, तसेच सामूहिक उद्योगासाठी जागा मिळवून देण्याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने महिलांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
गोंडपिपरी येथील ‘माविम’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला सबलीकरण व जनजागृती शिबिर शहरातील धनोजे कुणबी समाज सभागृहात पार पडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद चांदेकर यांनी गोंडपिंपरी शहरात महिलांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून कार्यालय व भवन उभारण्याबाबत आमदार देवराव भोंगळे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी सामूहिक उद्योगाचा प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन करून तो डीपीटीसीच्या बैठकीत मंजूर करण्यासाठी आमदार देवराव भोंगळे यांच्यामार्फत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. बाळू निमगडे यांनी करंजी येथील एमआयडीसीतील राखीव भूखंडातून सामूहिक उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रादेशिक अधिकाऱ्यांशी चर्चेकरिता पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. तहसीलदार शुभम बाहकर यांनी ‘माविम’च्या कार्यालयासाठी शासकीय भूखंडातून जागा उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी माविमच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी ही चळवळ समाजाची गरज पूर्ण करणारी असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोग लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा शालिनी कांबळे होत्या. उद्घाटन तहसीलदार शुभम बाहकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अजय दुर्गे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विनोद बुद्धे, वैष्णवी बोडलावार, संरक्षण अधिकारी विकास पाटील आदी उपस्थित होते.
प्रतिभा मेश्राम यांनी २०२५-२६ या वर्षाच्या आर्थिक अहवालाचे वाचन केले. मार्गदर्शकांनी महिलांना विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसंस्था, महिला बचत गट व सामाजिक कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक केंद्र व्यवस्थापक सुरेश गोंगले यांनी केले.



