कोरपणा शहराच्या सुरक्षेसाठी मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा : शहरातील वाढती वर्दळ, वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोरपणा शहरातील प्रमुख व संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कोरपणा हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून शहरात तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, आरोग्य केंद्रासह विविध शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ, बसस्थानक परिसर, शासकीय कार्यालयांच्या परिसरातील प्रमुख मार्ग तसेच शहराच्या प्रवेशद्वारांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास चोरी, भांडणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच इतर गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. एखादी घटना घडल्यास तपासासाठीही सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
त्यामुळे कोरपणा नगरपंचायतीने संबंधित पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने शहरातील मुख्य ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



