बांबू संवर्धनासाठी ग्रामस्थांचे श्रमदान; १० ‘थावळ्यां’ची निर्मिती
महापांढरवणी येथे FES च्या पुढाकारातून क्षेत्रीय प्रशिक्षण; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- बांबूच्या पर्यावरणीय पुनर्स्थापनेसह त्याचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिकांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी (FES) यांच्या पुढाकारातून जिवती तालुक्यातील महापांढरवणी गावातील CFR मान्यताप्राप्त ग्रामसभेत एकदिवसीय क्षेत्रीय सल्लामसलत व प्रशिक्षण घेण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रशिक्षणात तब्बल ६० ग्रामस्थांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता ग्रामस्थांनी बांबू क्षेत्रात स्वेच्छेने श्रमदान करून संवर्धनाच्या कामात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. विशेषतः महिला सदस्यांनी पुढाकार घेत बांबू क्षेत्रात १० ‘थावळे’ तयार केले.
प्रशिक्षणादरम्यान मृत व सुकलेले बांबू काढणे, नवीन बांबूच्या बेटांना वाढीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे तसेच बांबूच्या नैसर्गिक पुनरुत्पादनाला चालना देण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
परिसरातील उताराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर उपलब्ध दगडांचा वापर करून बांबू क्षेत्रात ‘थावळे’ तयार करण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले.
या ‘थावळ्यां’मुळे मातीची धूप रोखण्यासोबतच बांबूच्या नवीन कोंबांना व बेटांना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बांबू संवर्धनासोबतच परिसरातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास हातभार लागणार आहे.
यावेळी ग्रामस्थांना शाश्वत बांबू कापणीच्या पद्धतींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. बांबूच्या कांड्यांना क्रमांक देणे, त्यावर खूण करणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने कापणी करणे यामुळे बांबू संसाधनाचे दीर्घकालीन व्यवस्थापन कसे करता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
बांबूच्या पर्यावरणीय पुनर्स्थापनेबाबतची ही दुसरी चर्चा व प्रशिक्षण होते. स्थानिक ग्रामस्थांच्या पारंपरिक ज्ञानाला तांत्रिक मार्गदर्शनाची जोड मिळत असल्याने नैसर्गिक सामाईक संसाधनांचे संरक्षण, पुनरुत्पादन आणि शाश्वत वापरासाठी सामुदायिक कृती अधिक बळकट होत आहे. भविष्यात बांबू संसाधनाच्या शाश्वत व्यवस्थापनातून ग्रामस्थांच्या उपजीविका आणि आर्थिक संधींनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमाला संतोष पंडित, अभिषेक पालीवाल, सोयम आणि संतोष सलाम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्थानिक समुदायांच्या सक्रिय सहभागातून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, पुनर्स्थापना आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी अशा उपक्रमांना FES कडून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे.



