एचआयव्ही/एड्स जनजागृतीतून विद्यार्थ्यांना प्रतिबंधात्मक उपायांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सेस, जिवती येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि RRC क्लब, ग्रामीण रुग्णालय, कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन राऊत होते. यावेळी प्रा. डॉ. चतुर्दास तेलंग तसेच जिवतोडे, RRC क्लब, ग्रामीण रुग्णालय, कोरपना यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना एचआयव्ही संसर्गाची कारणे, संसर्गापासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षित वर्तन आणि एचआयव्ही/एड्सविषयी समाजात असलेले गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तींशी भेदभाव न करता त्यांच्याप्रती संवेदनशील, सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (NACO) 1097 या टोल-फ्री एड्स हेल्पलाइन क्रमांकाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. एचआयव्ही/एड्सविषयी माहिती, समुपदेशन आणि आवश्यक मार्गदर्शनासाठी 1097 या हेल्पलाइनचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन जी. यनगंदलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली डोर्लिकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NSS विभाग आणि RRC क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.



