पाच वर्षांपासून पायी भारत भ्रमण : २७ राज्यांचा प्रवास पूर्ण करून सौरभ देवांगन भद्रावतीत
भद्रावतीत विविध सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत व सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
छत्तीसगड राज्यातील बालोदा बाजार जिल्ह्यातील जारा येथील २९ वर्षीय युवक सौरभ देवांगन याने पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, प्रदूषणमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पायी भारतभ्रमणाचा प्रवास आज भद्रावती येथे पोहोचला. दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झालेल्या या अनोख्या संकल्पयात्रेत आतापर्यंत तब्बल २७ राज्ये पायदळ पार करीत सौरभने हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
भारतभ्रमणाच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पामुळे भद्रावती शहरात दाखल झालेल्या सौरभ देवांगनचे विविध सामाजिक संस्था, पत्रकार आणि नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. भद्रावती तालुका पत्रकार संघातर्फे सचिव दिलीप मांढरे, अतुल कोल्हे, दिलीप ठेंगे, सामाजिक कार्यकर्ते सूरज शहा, रोटरी क्लबतर्फे प्रकाश पिंपळकर, किशोर खंडाळकर, हनुमान घोटेकर, इको-प्रो तर्फे संदीप जीवने, अमोल दौलतकर, जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळातर्फे बंडू परचाके, अपडेट इंडिया तर्फे लिमेश माणूसमारे तसेच सनी पॉईंट हॉटेलचे उपलंचीवार बंधू यांनी सौरभचा सत्कार करून त्याच्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सौरभ देवांगन आपल्या पायी प्रवासातून केवळ भारतभ्रमण करीत नसून समाजाला पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत आहे. “झाडे वाचवा, झाडे जगवा; पाणी वाचवा; प्रदूषण टाळा; पर्यावरण सुरक्षित ठेवा आणि भारतीय अखंडता व एकात्मता कायम ठेवा,” असा संदेश देत त्याचा हा प्रवास सुरू आहे.
दुर्दम्य आशा, आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर सलग पाच वर्षे पायी भ्रमण करणाऱ्या सौरभने विविध राज्यांतील लोकजीवन, संस्कृती आणि सामाजिक परिस्थिती जवळून अनुभवली आहे. २७ राज्यांचा पायी प्रवास पूर्ण केल्यानंतर तो आता महाराष्ट्रातून आपल्या छत्तीसगडमधील रायपूर शहराच्या दिशेने मार्गक्रमण करीत असून रायपूर येथे या दीर्घ भारतभ्रमणाचा समारोप होणार असल्याचे सांगण्यात आले.
पायी भारतभ्रमणाच्या या विलक्षण ध्येयामागे कोणतेही व्यावसायिक उद्दिष्ट नसून पर्यावरण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याची तळमळ असल्याचे सौरभच्या प्रवासातून दिसून येते. प्रतिकूल परिस्थिती, प्रदीर्घ अंतर, अनोळखी प्रदेश आणि प्रवासातील विविध अडचणींवर मात करीत त्याने आपला संकल्प अखंडपणे सुरू ठेवला आहे.
भद्रावतीकरांनी केलेल्या प्रेमळ स्वागताने आणि आदरातिथ्याने सौरभ देवांगन भारावून गेला. यावेळी त्याने भद्रावतीकरांचे आभार मानत, मिळालेला स्नेह आणि प्रोत्साहन आपल्या पुढील प्रवासासाठी नवी ऊर्जा देणारे असल्याची भावना व्यक्त केली.
पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन पायी निघालेल्या या तरुणाच्या जिद्दीला भद्रावतीत मिळालेला सन्मान म्हणजे समाजमनाने त्याच्या संकल्पयात्रेला दिलेली दाद ठरली.



