ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेस आक्रमक

तालुक्यातील आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी प्रशासनाला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिंपरी तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या निवास, भोजन, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि शैक्षणिक सुविधांअभावी तालुका काँग्रेस कमिटीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन सर्व आश्रमशाळांची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा समाधानकारक पद्धतीने मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी निवासी स्वरूपात आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने त्यांच्या निवास, भोजन, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि शैक्षणिक सुविधांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

काही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेशा झोपेच्या सुविधा उपलब्ध नसणे, जमिनीवर झोपण्याची वेळ येणे, भोजनाच्या दर्जाबाबत तक्रारी, अपुरी व अस्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था तसेच पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद असणे यासारख्या समस्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा व इतर शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, मानसिक स्थितीवर तसेच शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आश्रमशाळांना भेट देऊन वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या निधीतून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना त्या प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीप्रमाणे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यास जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचा हा संवेदनशील प्रश्न असून प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही न केल्यास तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनकर्त्यांमध्ये तालुकाध्यक्ष अशोक रेचणकर, अनुसूचित जमाती प्रदेश सचिव ॲड. सचिन फुलझेले, शहराध्यक्ष राजू झाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विपिन पेदूलवार, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष सारनाथ बक्षी, प्रा. शंभुजी येलेकर, नगरसेविका वनिता वाघाडे, राजू राऊत, सोशल मीडिया विभाग प्रमुख राजेश डोंगरे, आशिष निमगडे, शेषराव बट्टे, जंपलवार यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

*आश्रमशाळांमध्ये करावयाच्या उपाययोजना*

विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पलंग, गाद्या, चादरी व आवश्यक निवास सुविधा उपलब्ध करून देणे, दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळते की नाही याची तपासणी करणे, स्वच्छतागृहांची संख्या व स्वच्छता सुधारणे, २४ तास सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, बंद असलेल्या वॉटर फिल्टर व शुद्धीकरण यंत्रणा तातडीने सुरू करणे, आश्रमशाळांच्या इमारती, वसतिगृह, स्वयंपाकगृह व परिसराची नियमित स्वच्छता राखणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये