ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत आढळला रंग बदलणारा दुर्मिळ हत्ती सरडा

वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्तता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         शहरातील किल्ला वॉर्ड परिसरातील रहिवासी रमेश गुंडावार यांच्या घरी दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण असा हत्ती सरडा (Indian Chameleon) आढळून आला. घरात हा सरडा आढळल्याची माहिती मिळताच गुंडावार यांनी तत्काळ SARD NGO, भद्रावती यांच्याशी संपर्क साधून वन्यजीव बचाव पथकाला माहिती दिली.

माहिती मिळताच अनुप येरणे, आशिष चहाकाटे, शैलेश पारेकर, श्रीपाद बाकरे, पंकज मूरकुटे यांच्यासह Rescuer Team घटनास्थळी दाखल झाले. पथकाने हत्ती सरड्याला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनपरीक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनरक्षक अमोल तिकट यांच्या सहकार्याने हत्ती सरड्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

रंग बदलण्यासह अनेक वैशिष्ट्ये

हत्ती सरड्याचे शास्त्रीय नाव Chamaeleo zeylanicus असून तो भारतातील स्थानिक गिरगिटाच्या प्रजातींपैकी एक आहे. महाराष्ट्रासह द्वीपकल्पीय भारतातील विविध भागांत त्याचा आढळ होतो. हा प्रामुख्याने झाडे व झुडपांवर राहणारा, दिवसा सक्रिय असणारा आणि कीटकभक्षी सरडा आहे.

हत्ती सरड्याची स्वतंत्रपणे हालचाल करणारे डोळे, लांब व वेगाने पुढे झेपावणारी जीभ, फांद्या घट्ट पकडण्यासाठी उपयोगी पडणारी गुंडाळलेली शेपटी आणि रंग बदलण्याची क्षमता ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रंगबदल हा केवळ परिसरात लपण्यासाठी होत नसून शरीराची अवस्था, तापमान आणि इतर वर्तनात्मक कारणांशीही संबंधित असतो.

वन्यजीव आढळल्यास सावधगिरी आवश्यक

शहर किंवा ग्रामीण भागात वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी त्यांना पकडण्याचा किंवा इजा करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी तत्काळ वनविभाग किंवा अधिकृत वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क साधावा. वन्यजीवांचा सुरक्षित बचाव करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करणे हेच वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये