वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे पारधी बेडा, केळझर येथे संवाद व मार्गदर्शन उपक्रम संपन्न
समाज प्रबोधन, बालसुरक्षा आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीवर विशेष भर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा पोलिसांकडून जनसंवाद आणि समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच शृंखलेचा भाग म्हणून काल, दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत येणाऱ्या मौजा केळझर येथील पारधी बेड्यावर एक विशेष संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर उपक्रम श्री. सुनील महाडिक (उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा), सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे (ठाणेदार, सेलू), सेलू पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. नामदेव भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. पारधी समाजातील चालीरीती व संस्कृतीचा योग्य तो आदर राखून, स्थानिक नागरिकांना आणि बालकांना सहजरीत्या समजेल अशा कौशल्याच्या भाषेत टप्प्याटप्याने हे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित घटक आणि त्यांना दिलेले मार्गदर्शन खालीलप्रमाणेः
१. लहान मुलांसाठी मार्गदर्शक मुद्देः
शिक्षण व शाळाः नियमित शाळेत जाण्याचे महत्त्व पटवून देत शिक्षणाने आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक बदलांची माहिती देण्यात आली तसेच बालमजुरीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. बालसुरक्षा व जनजागृतीः ‘गुड टच आणि बॅड टच’ मधील फरक, अनोळखी व्यक्तींपासून सावधान राहणे, कोणत्याही गैरप्रकाराला ठाम विरोध करणे आणि आपत्कालीन मदतीसाठी ‘चाइल्ड हेल्पलाईन (१०९८)’ चा वापर कसा करावा याबाबत बालकांना अवगत करण्यात आले.
आरोग्य, स्वच्छता व क्रीडाः दैनंदिन वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याचे महत्त्व सांगण्यासोबतच अभ्यासासह खेळ व इतर छंद जोपासण्यासाठी बालकांना प्रोत्साहित करण्यात आले.
२. पालकांसाठी मार्गदर्शक मुद्देः
शिक्षण व बालविवाह प्रतिबंधः पाल्यांना विशेषतः मुलींना, कोणत्याही परिस्थितीत शिक्षण अर्धवट न सोडता पूर्ण करू देणे आणि अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न न लावता बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. शासकीय योजना व दस्तऐवजः मुलांचे ओळखपत्र (उदा. आधार कार्ड), जातीचे दाखले, जन्म दाखले व बँक खाती उघडून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
व्यसनमुक्ती व गुन्हेगारीपासून अंतरः दारू व इतर व्यसनांपासून दूर राहून कौटुंबिक वातावरण शांत ठेवणे, कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला किंवा अफवांना बळी न पडता समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस व समाज समन्वयः पोलीस हे नागरिकांचे रक्षक व मित्र आहेत ही भावना निर्माण करून पोलीस आणि समाज यांच्यात विश्वासाचे नाते अधिक घट्ट करण्यावर भर देण्यात आला. सदर बैठकीला जवळपास १८०० नागरिक उपस्थित होते.
