पुलगाव पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई
३७ हजार रुपयांची ब्राऊन शुगर जप्त, दोघांना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व अमली पदार्थांच्या तस्करीवर पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. याच मालिकेत पुलगाव पोलिसांनी धडक कारवाई करत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून ३७,२०० रुपये किमतीची ‘ब्राऊन शुगर’ (हेरॉईन) आणि मोबाईल फोन असा एकूण ५७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.४० ते ५.५० वाजेच्या सुमारास पुलगाव येथील शीतला माता मंदिर परिसरात काही इसम अवैध अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती (मुखबीरमार्फत) पोलिसांना मिळाली. सदर बातमीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शहाजी घोडके, पंच आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.
एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करत करण्यात आलेल्या या रेड कारवाईत खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेः
१) प्रथम धनराज चटपकर वय २३ वर्षे, रा. इंदिरा नगर, पुलगाव, ता. देवळी
२) जावेद अहमद मुख्तार अहमद वय ४३ वर्षे, रा. गुंजखेडा, ता. देवळी जप्त करण्यात आलेला मुद्देमालःब्राऊन शुगर (हेरॉईन): ६.५६ ग्रॅम (निव्वळ वजन) किमत ₹३७, २००/-
मोबाईल फोनः आरोपी क्र. १ याच्याकडून ओप्पो कंपनीचा मोबाईल (किंमत ₹१०,०००/-) व आरोपी क्र. २ याच्याकडून ओप्पो कंपनीचा मोबाईल (किंमत ₹१५,०००/-) एकूण जप्त मुद्देमाल: ₹५७, २००/- (सत्तावन्न हजार दोनशे रुपये).
घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा रीतसर पंचनामा करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन पुलगाव येथे अप क्र. ६८३/२०२६, कलम ८ (क), २१(ब), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनकर करत आहेत.

