योगेश मुऱ्हेकर यांची शिवसेना कामगार संघटनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती..!
पत्रकारिता, ग्रामविकासातून कामगारांच्या हक्कांसाठी नवी जबाबदारी ; जिल्हा प्रमुख बंडू भाऊ हजारे यांनी योगेश मुऱ्हेकर सामाजिक कामाची दखल घेऊन यांच्या पाठपुराव्याला यश..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
सामाजिक, ग्रामविकास आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याची ठळक ओळख निर्माण करणारे योगेश मुऱ्हेकर यांची शिवसेना श्रमिक कामगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे पत्रकार तसेच युवा शक्ती ग्राम विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मुऱ्हेकर यांच्या खांद्यावर आता कामगारांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक नेतृत्वाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. शिवसेना श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश सचिव अमित आर. भटपार यांच्या स्वाक्षरीने मुऱ्हेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्ती प्रक्रियेत शिवसेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ हजारे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. मुरेकर यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांच्या नियुक्तीसाठी हजारे यांनी केलेला पाठपुरावा मोलाचा ठरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुऱ्हेकर यांच्यावर जिल्हास्तरीय कामगार संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.
पत्रकार म्हणून ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे मुऱ्हेकर यांनी युवा शक्ती ग्राम विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही ग्रामविकासाच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका बजावली आहे. आता याच अनुभवाच्या बळावर कामगारांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
शिवसेना श्रमिक कामगार संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कामगारांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कामगारांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करणे, हे मुरेकर यांच्यासमोरील प्रमुख आव्हान राहणार आहे.
पत्रकारिता, ग्रामविकास आणि सामाजिक कार्याचा अनुभव आता कामगारांच्या लढ्यासाठी उपयोगात येणार असल्याने त्यांच्या नियुक्तीकडे चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना श्रमिक कामगार संघटनेला जिल्ह्यात नवे संघटनात्मक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
योगेश मुऱ्हेकर यांच्या नियुक्तीचे शिवसैनिक, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि मित्रपरिवारातून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



