कोरपणा–कोळशी मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह
निकृष्ट कामामुळे वाहनचालक त्रस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा :_ कोरपणा ते कोळशी मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले असले, तरी कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
खड्ड्यांमध्ये योग्य पद्धतीने साहित्य टाकून रस्ता दुरुस्त करण्याऐवजी आजूबाजूला पडलेली गिट्टी, मुरूम व इतर साहित्य वापरून केवळ वरवरची डागडुजी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे पुन्हा उखडण्याची शक्यता निर्माण झाली असून, सार्वजनिक निधीचा योग्य वापर होत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहने ये-जा करतात. खड्ड्यांमध्ये करण्यात येणारी अशी तात्पुरती डागडुजी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
संबंधित विभागाने या कामाची तातडीने पाहणी करून वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासावी, काम नियमानुसार व दर्जेदार पद्धतीने करून घ्यावे आणि निकृष्ट काम आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी कोरपणा–कोळशी मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.



