भद्रावतीतील खड्ड्यांविरोधात काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन
सत्तारूढ पक्षाच्या विरोधात विरोधक रस्त्यावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील विविध प्रभागांतील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
यापूर्वी बाजार वॉर्ड परिसरातील खड्ड्यात देशी झाड लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला होता. मुरूम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊनही कार्यवाही न झाल्याने बुधवारी गौतम नगर येथे भजन आंदोलन, तर सुमठाणा-खापरी परिसरात मच्छी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात नगरसेवक सुनील नामोजवार, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेविका सरिता सूर, नगरसेविका जाधव, नगरसेविका सीमा पवार, नगरसेविका पल्लवी तामगाडगे, नगरसेविका कल्पना भुसारी, नगरसेविका रंजना गिरटकर आणि नगरसेविका साव यांच्यासह काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. दोन पक्षांच्या नगरसेवकांनी आंदोलन करूनही अद्याप मुरूम उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.



