रासेयो विभागाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न
‘एक वृक्ष... हजारो श्वास’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

चांदा ब्लास्ट
घुग्घूस : चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरचे संस्थापक प्राचार्य स्व. वसंतरावजी दोंतुलवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूसच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तसेच संत श्री साईबाबा बहुद्देशीय संस्था व श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ, घुग्घूस यांच्या सहकार्याने ‘एक वृक्ष… हजारो श्वास’ या संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
घुग्घूस येथील आठवडी बाजार वॉर्ड क्रमांक ५ मधील खुल्या मैदानावर गुरुवार, दि.२० ऑगस्ट २०२६ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आसुटकर तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश शेंडे व मधुकर मालेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि लावलेल्या वृक्षांची नियमित निगा राखण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात संत श्री साईबाबा बहुद्देशीय संस्था व श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी स्वप्निल वाढाई, ललित होकम, युवा सामाजिक कार्यकर्ते शेख हनीफ, सचिन बोंडे, गणेश वाजे, रूपेश कोहळे, पंकज बावणे, शंकर कामतवार, वैष्णवी बोंडे व सविता वालदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व मान्यवरांनी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश जमदाडे व डॉ. माधव कांडणगिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी सहकार्य केले.



