ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाबा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस भरतीची तयारी करणारा विठ्ठल मोहुर्ले जागीच ठार

वर्कआऊटसाठी जात असताना काळाचा घाला; कुटुंबाचा आधार हरपला, गावावर शोककळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या धाबा येथील २८ वर्षीय विठ्ठल सुधाकर मोहुर्ले याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे धाबा गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर धाबा–गोडपिपरी मार्गावर घडली. विठ्ठल हा वर्कआऊट करण्यासाठी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेमुळे धाबा गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत मेहनती, निर्व्यसनी आणि मनमिळाऊ तरुण म्हणून विठ्ठलचा गावात नावलौकिक होता. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने वयात येताच त्याने कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.

शिक्षणात हुशार असूनही उच्च शिक्षणाचा मार्ग न स्वीकारता विठ्ठलने पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून तयारी सुरू ठेवली होती. पोलीस बनून आई आणि बहिणीला आधार देण्याचे त्याचे स्वप्न होते. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील विठ्ठल कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शेतमजुरीही करीत होता. कुटुंबाचा आधारस्तंभ आणि गावातील युवकांसाठी आदर्श ठरलेला विठ्ठल अकाली निघून गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.

शवविच्छेदनानंतर धाबा येथील स्मशानभूमीत आज दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, धाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी धाबा पोलीस विभागाकडून तपास सुरू आहे.

*कुटुंबाला तातडीने मदतीची मागणी*

विठ्ठलच्या पश्चात आई आणि बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. शासन व प्रशासनाने विठ्ठलच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे गोडपिपरी तालुका अध्यक्ष रामकृष्ण सांगडे यांनी केली आहे.

पहाटेच्या वेळी मुख्य रस्त्यांवर अपुऱ्या प्रकाशामुळे आणि भरधाव वाहनांमुळे अपघाताचा मोठा धोका असतो. पोलिस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुण_तरुणांनी तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला_पुरुषांनी मुख्य रस्त्यावर धावणे अथवा फिरणे टाळावे. सरावासाठी आणि व्यायामासाठी रस्त्यांऐवजी सुरक्षित शासकीय मैदाने, शाळा_कॉलेजची मैदाने किंवा मोकळ्या जागांचाच वापर करावा.

     *हेमंत पवार, ठाणेदार, उप पोलीस स्टेशन, धाबा*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये