भद्रावतीत एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक : १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
ऊर्जाग्राम गेटसमोरील भीषण अपघात : दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH-930) ऊर्जाग्राम गेटसमोर एसटी बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना मंगळवारी भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मृतकाचे नाव बादल सुनील भोयर (१७, रा. गोरजा, ता. भद्रावती) असे आहे. तर दुचाकी चालक साहिल मोरेश्वर गोरे (२१, रा. चीरादेवी) आणि तनुज सुभाष ढवस (१८, रा. घोट निंबाळा) हे दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही MH-34-CF-8510 क्रमांकाच्या दुचाकीने प्रवास करीत होते. ऊर्जाग्राम कॉलनीतून दुचाकीने NH-930 महामार्गावर प्रवेश करत असताना MH-14-MH-5322 क्रमांकाच्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकीवरील सर्वात मागे बसलेला बादल भोयर रस्त्यावर फेकला गेला. त्यानंतर तो एसटी बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, दुचाकी चालक साहिल गोरे आणि तनुज ढवस हे दोघे डिव्हायडरवर पडल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर बादल भोयर याला पुढील कार्यवाहीसाठी खासगी टाटा एस वाहनातून शासकीय रुग्णालय, भद्रावती येथे पाठविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे, API धोंगडे, ASI नायडू, HC नितेश, PC कसारे, HC गंदेवार, PC धीरज आणि भूषण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या प्रकरणी भद्रावती पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास करण्यात येत आहे.



