ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नायलॉन मांजाचा वापर केल्यास २५ हजारांचा दंड; विक्रेत्यांनाही २.५० लाखांचा दंड!

पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर टाळा; मानवी जीवितासह पर्यावरणालाही गंभीर धोका

चांदा ब्लास्ट

पतंग उडविण्याचा आनंद साजरा करताना वापरण्यात येणारा नायलॉन मांजा (चायनीज मांजा) हा केवळ धोकादायक नसून मानवी जीवितासह पर्यावरणासाठीही गंभीर धोका निर्माण करणारा ठरत आहे. नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो, तर अनेक जण गंभीर जखमी होतात. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वर्धा पोलिसांनी दिला आहे.

दुचाकीस्वारांच्या गळ्याला किंवा शरीराच्या इतर भागांना मांजा अडकून गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी हा मांजा मृत्यूचा सापळा ठरू शकतो. नायलॉन मांजा सहज नष्ट न होणाऱ्या कृत्रिम पदार्थांपासून तयार होत असल्याने तो पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतो. झाडे, वीजवाहिन्या, इमारती तसेच सार्वजनिक ठिकाणी अडकलेला मांजा पक्षी आणि मानवाच्या जीवितासही धोकादायक ठरतो.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजाच्या वापराबाबत कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविताना आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांकडून नायलॉन मांजाचा वापर झाल्यास त्यांच्या पालकांकडून दंड वसूल केला जाईल.

तसेच नायलॉन मांजाची विक्री करणारे विक्रेते, दुकानदार यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दोषी व्यक्तीने दंड भरण्यास टाळाटाळ केल्यास जमीन महसूल प्रक्रियेनुसार दंडाची वसुली करण्यात येईल. प्रत्येक उल्लंघनासाठी स्वतंत्र दंड आकारण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा वर्धा पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप क्रमांक 8888338354 अथवा 112 या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

नायलॉन मांजाचा वापर टाळणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक व पर्यावरणीय कर्तव्य आहे. मानवी जीवित, पशुपक्षी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.

आपला सण, आपला आनंद; पण कोणाच्याही जीवाची किंमत मोजून नाही!

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये