उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही शेतात मोजणी.!
एमआयडीसीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा ; भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी काढले शेताबाहेर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी एमआयडीसीसाठी १२ गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी संपादित करण्याच्या हालचालींना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही गुरुवार,१९ नोव्हेंबर रोजी वढोली डांबर प्लांटजवळील प्रवीण कोहपरे यांच्या शेतात भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी मोजणी यंत्रासह दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना मोजणी करण्यास मज्जाव केला आणि त्यांना शेताबाहेर काढले.
विशेष म्हणजे, याच दिवशी उपविभागीय कार्यालयात शेतकरी एकता समिती व औद्योगिक कृती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत केवळ सर्वेक्षण करण्यात येणार असून कोणाच्याही शेतजमिनीत प्रत्यक्ष प्रवेश केला जाणार नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
मात्र, बैठकीनंतर काही वेळातच मोजणी सुरू असल्याचे फोन समितीच्या पदाधिकाऱ्यांना आले. त्यानंतर शेतकरी एकता समिती व औद्योगिक कृती संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेथे प्रवीण कोहपरे यांच्या शेतात मोजणी यंत्रासह भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी आढळून आले. शेतकऱ्यांनी त्यांना मोजणी थांबविण्यास सांगत ठाम विरोध दर्शविला आणि शेताबाहेर जाण्यास भाग पाडले.
करंजी एमआयडीसीसाठी १२ गावांतील शेतकरी आपली सुपीक जमीन देण्यास तयार नसून, कोणत्याही परिस्थितीत जमिनीची मोजणी अथवा संपादन मान्य नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. प्रशासनाच्या आश्वासनानंतरही शेतात मोजणीचे अधिकारी पोहोचत असतील, तर शेतकऱ्यांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
यावेळी शेतकरी एकता समिती व औद्योगिक कृती संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते. या प्रकरणानंतर एमआयडीसीविरोधातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


