भद्रावती तालुक्यात अवैध दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!
मुरसा येथे ३ हजार ६८० रुपयांचा देशी दारू साठा जप्त : तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीविरोधात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. शेगाव येथील कारवाईनंतर आता भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा मुरसा येथे छापा टाकून अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी कारवाईच्या कक्षेत आणले. या कारवाईत ३ हजार ६८० रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा मुरसा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारू विक्रीविरोधात कारवाई केली. यावेळी अजय दिलीप नवले (वय २८, रा. मुरसा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्याकडून ९० मिली क्षमतेच्या रॉकेट संत्रा कंपनीच्या एकूण ९२ देशी दारूच्या निपा जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ३ हजार ६८० रुपये असून, पंचांसमक्ष ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १०८२/२०२६ अन्वये कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, रजनीकांत पुठ्ठावार, पोलीस शिपाई विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, प्रतीक हेमके तसेच वाहनचालक दिनेश अराडे यांच्या उपविभाग वरोरा पथकाने केली. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या या सलग कारवायांमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


