दोन सिलेंडरच्या स्फोटाने चंद्रपूर हादरले – मसिहा लॉनजवळील घरात मध्यरात्री भीषण स्फोट
दोन व्यक्ती गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
चंद्रपूर : शहरातील मसिहा लॉनजवळ गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास एका घरात दोन गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याचे समजते.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. स्फोटानंतर घराला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान, संबंधित घरात तब्बल २० ते २५ गॅस सिलेंडर असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
वस्तीच्या परिसरात अशा प्रकारे गॅस सिलेंडरचा साठा करून अवैध रिफिलिंग केले जात असल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
घटनेप्रकरणी पोलीस तपास सुरू असून, घरात सिलेंडरचा साठा का करण्यात आला होता आणि गॅस भरण्याचा अवैध व्यवसाय सुरू होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
मध्यरात्री घडलेल्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असुन अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार खरा असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


