जनगणना २०२६ च्या पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांचे मानधन तात्काळ अदा करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ केंद्र शासनाच्या जनगणना २०२६ कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील जनगणनेचे काम संबंधित कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले आहे. या कामासाठी केंद्र शासनाकडून राज्यांना तसेच जिल्ह्यांना कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी आवश्यक निधी वितरित करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अद्याप संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे मानधन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे जनगणना कामात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मागासवर्गीय कर्मचारी संघटनाची कृती समिती जिल्हा शाखा–चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाद्वारे जनगणना २०२६ च्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केलेल्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जनगणनेचे काम हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून, संबंधित कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचे मानधन विनाकारण प्रलंबित ठेवू नये. संबंधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी/कार्यालयामार्फत आवश्यक कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना तातडीने मानधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मानधन लवकरात लवकर अदा करण्याची मागणी मागासवर्गीय कर्मचारी कृती समितीचे
अध्यक्ष राजकुमार चिकटे, महासचिव जगदीप दुधे, मागासवर्गीय संघटनांच्या कृती समितीचे मार्गदर्शक चानकुमार खोब्रागडे, अरुण खराते, अजित साव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.



