‘जल आहे तर जीवन आहे’चा संदेश देत कुडेसावलीत जल अर्पण.!
गांधी जयंतीनिमित्त जलपूजन ; जलसंवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत कुडेसावली, पंचायत समिती गोंडपिपरी येथे जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी संजय नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांच्या सहभागातून जलपूजन व जल अर्पण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा विस्तार अधिकारी पंचायत जीवन प्रधान, ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र खोब्रागडे, गट समन्वयक चेतन कलगट्टीवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
‘जल आहे तर जीवन आहे’ या संदेशातून जलसंवर्धन, जलसंरक्षण आणि पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे, जलस्रोतांची देखभाल करणे आणि पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जलसंवर्धन केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक कुटुंबाने पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करावी, असे आवाहन करण्यात आले. ‘पाणी वाचवा, जलस्रोत जपा आणि गाव समृद्ध करा’ या संदेशातून जलसंवर्धनाची चळवळ व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.



