NHAI ने स्थानिक प्रश्न तातडीने सोडवावेत ; अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरणार – सुभाषभाऊ धोटे
महामार्गावरील स्पीडब्रेकर, सर्व्हिस रोड, अंडरपास, गट्टू कामांसह शेतकरी व नागरिकांच्या समस्यांवर सुभाषभाऊ धोटे आक्रमक.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महाराष्ट्र_ तेलंगणा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे राजुरा शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक आणि वाहनधारकांना निर्माण झालेल्या विविध समस्यांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी NHAI प्रशासनाला तातडीने कामे मार्गी लावण्याचे आवाहन करत, समस्या सोडविल्या नाहीत तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे निर्माण झालेल्या स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऑगस्ट महिन्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या उपस्थितीत NHAI अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत राजुरा शहर व ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र बैठकीनंतरही अनेक प्रश्न जैसे थे असल्याने काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजुरा-बामणी रस्त्याची झालेली दुरवस्था, महामार्गालगत सुरू असलेल्या गट्टू कामांचा निकृष्ट दर्जा, धोकादायक स्पीडब्रेकर, अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे सर्व्हिस रोड, महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतजमिनी, शेतकरी व नागरिकांच्या ये-जा करण्याच्या अडचणी तसेच वाहतुकीतील अडथळे यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय राजुरा रेल्वे लाईनजवळील अंडरपास पूल, बसस्थानक परिसरातील समस्या आणि महामार्गामुळे विस्कळीत झालेली स्थानिक वाहतूक व्यवस्था याकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. वारंवार निवेदने, बैठका आणि चर्चांनंतरही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा अंत होत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाने केवळ आश्वासने देऊन प्रश्न प्रलंबित ठेवू नयेत. बैठकीत दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात. NHAI ने स्थानिक समस्या तातडीने सोडविल्या नाहीत, तर काँग्रेस पक्ष नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुभाषभाऊ धोटे यांनी दिला. त्यामुळे आता NHAI प्रशासन या प्रश्नांवर प्रत्यक्ष कोणती कार्यवाही करते आणि प्रलंबित कामांना किती गती मिळते, याकडे राजुरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



