तहसील प्रशासनाच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विवेकानंद महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
लोकशाहीच्या प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि पात्र विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणीची संधी मिळावी, या उद्देशाने विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे आज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला भद्रावती तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज आकनुरवार आणि महसूल सहायक अमर श्रीरामे उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच मतदार म्हणून नोंदणी करण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिबिरादरम्यान इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे मतदार नोंदणीसाठीचे अर्ज अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली भरून घेण्यात आले. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेण्याची तसेच आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याची सुविधा महाविद्यालयाच्या परिसरातच उपलब्ध झाली. युवक हा लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून, मतदानाचा अधिकार हा केवळ अधिकार नसून लोकशाहीतील सहभागाची जबाबदारीही आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातच त्यांना मतदार नोंदणी आणि लोकशाही प्रक्रियेची माहिती मिळावी, या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे पात्र विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्रपणे जाण्याची आवश्यकता भासली नाही.
प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना थेट सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम ठरला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, डॉ यशवंत घुमे, प्रा. अमोल ठाकरे, डॉ जयवंत काकडे, लिपिक दीपक तेलंग, संजय तामगाडगे, आशिष दुपारे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी संदीप भस्के , तहसीलदार संदीप पानमंद यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयातच विशेष शिबिर आयोजित करून मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन व प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया पूर्ण करून दिल्याबद्दल तहसील प्रशासनाचे महाविद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले.
तहसील प्रशासन आणि विवेकानंद महाविद्यालय यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले असून, प्रशासनाच्या या विद्यार्थीहितैषी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



