ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाहतूक नियमांची शिकवण अन् हिरवाईचा संकल्प

धाबा पोलिसांकडून गोजोली आश्रमशाळेत अनोखा उपक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ श्रीराम आदिवासी आश्रमशाळा, गोजोली येथे विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा नियमांबाबत मार्गदर्शन तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमात धाबा उपपोलीस ठाण्याचे ठाणेदार वीरेंद्र केदारे तसेच पोलीस अंमलदार श्रावण कुत्तरमारे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा नियमांची माहिती दिली. रस्त्यावरून पायी जाताना घ्यावयाची काळजी, दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन, रस्त्यावर मोबाईलचा वापर टाळणे तसेच अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे स्वतः सुरक्षित राहण्याबरोबरच कुटुंबीय व समाजातील इतरांनाही वाहतूक सुरक्षेबाबत जागरूक करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यानंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. लावलेल्या वृक्षांची नियमित देखभाल करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी घ्यावी, असा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक संजय मोरे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतूक सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही विषयांचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये