अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नका; वाहतूक शाखेचा पालकांना इशारा
जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा नवनियुक्त पुलिस निरीक्षक विजय घुले यांचे पालकांना आदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने पालकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हे कायद्याचे उल्लंघन असून, त्यातून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने पालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्धा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुले पालकांची वाहने चालविताना आढळून येतात. मात्र, १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना देता येत नाही. अशा मुलांकडून वाहन चालवून घेतल्यास संबंधित पालक किंवा वाहनमालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, १८ वर्षांखालील व्यक्तीने वाहन चालविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कलम ३(१), १८१ अंतर्गत चालकावर कारवाई करून तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपये दंड होऊ शकतो. तसेच वाहनमालकावर कलम ५/१८० अन्वये तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
अल्पवयीन मुलाने वाहन चालवून अपघात किंवा अन्य गुन्हा केल्यास संबंधित पालक अथवा वाहनमालकावरही मोटार वाहन कायद्यातील कलम १९९(अ)(२) अन्वये कठोर कारवाई होऊ शकते. यामध्ये तीन वर्षांपर्यंत कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
दरम्यान, वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने दि. १६ ऑगस्ट २०२६ पासून वर्धा शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये. तरुण पिढीची सुरक्षितता आणि रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी पालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक विजय घुले जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी केले आहे.



