ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस-जनता संवाद व समन्वय बैठकीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस व जनता यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे, पोलीसांच्या कामकाजामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग व प्रतिसाद वाढविणे तसेच आगामी सण-उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनतेचे सहकार्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने समाजातील विविध घटकांसोबत पोलीस-जनता संवाद व समन्वय बैठकीचे आयोजन दि. १६ ऑगस्ट २०२६ ते दि. २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये महिला बचत गट, महिला प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत पोलीस-जनता संवाद व समन्वय बैठका आयोजित करण्यात आल्या.

सदर बैठकांमध्ये सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिला बचत गटाच्या असणाऱ्या तक्रारी, आपातकालीन परिस्थितीत पोलीस मदत तसेच आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना, अफवा व गैरसमजांना आळा घालणे, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह /भ्रामक संदेशांपासून सावध राहणे तसेच कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीसांना माहिती देणे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित महिला प्रतिनिधी, महिला बचत गटांच्या सदस्य व ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक पातळीवरील समस्या, सूचना व अपेक्षा पोलीस प्रशासनासमोर मांडल्यां. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सदर संवाद बैठकीला जवळपास १८०० प्रतिनिधी उपस्थित होते.

सुरक्षीत समाजासाठी पोलीस आणि जनता यांच्यातील परस्पर विश्वास, संवाद व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे या भावनेतून सदर पोलीस-जनता संवाद उपक्रम राबविण्यात येत असून, आगामी काळातही विविध घटकांशी संवाद साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जनतेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

सदरचे पोलीस जनता संवाद समन्वय बैठकांचे आयोजन हे सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शनात करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये