नेहा बोरा सामाजिक कार्यकर्त्यां यांच्या वरील शाईफेक प्रकरणी कठोर कारवाईची भीम टायगर सेनाचे जिल्हा अध्यक्ष विशाल रामटेके यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA)च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावर शाई फेकणाऱ्या व्यक्तीवर तसेच त्याला प्रवृत्त करणाऱ्या संघटनेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम टायगर सेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सामाजिक जनजागृतीचे कार्य करणाऱ्या नेहा बोरा यांच्यावर शाई फेकण्याची घटना निषेधार्ह असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक वातावरण दूषित होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच JPSC-JSSC परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ही घटना घडल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
नेहा बोरा यांच्यावर आंदोलनादरम्यान मनुवादी विचारसरणीच्या इसमाने शाई फेकल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या घटनेमागे मोठे षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त करत संबंधित व्यक्ती तसेच त्याला प्रवृत्त करणाऱ्या संघटनेची चौकशी करून कठोर कलमांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्ली येथे आंदोलनकर्त्यांनी उपोषण केल्याचा तसेच या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अन्यथा भीम टायगर सेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन भीम टायगर सेना वर्धा जिल्हाध्यक्ष विशाल रामटेकें यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.



