नशामुक्त युवा अभियानातून व्यसनमुक्तीचा संदेश
जिवतीत समुपदेशन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- चंद्रपूर पोलीस दल आणि विदर्भ महाविद्यालय, जिवती येथील विद्यार्थी समुपदेशन समिती व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा अभियान’ अंतर्गत ‘नशामुक्त युवा आणि समुपदेशन’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक जिवती पोलीस ठाण्याचे पीएसआय निखिल राहटे यांनी युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेचे गांभीर्य स्पष्ट करत अमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, सकारात्मक विचार आणि ध्येयवादी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन राऊत यांनी, “व्यसनमुक्त युवा हीच सशक्त समाजाची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी व्यसनांपासून कटाक्षाने दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या विचारमंचावर डॉ. गंगाधर लांडगे तथा प्रा. लक्ष्मण मंगाम उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे आयोजन डॉ. श्रीकांत पानघाटे आणि डॉ. वैशाली डोर्लिकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना सकारात्मक व ध्येयवादी जीवनाकडे प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.



