ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी चंद्रपुरात भारतीय मजदूर संघाचे आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कामगारांचा निदर्शने व धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- कामगारांच्या प्रलंबित मागण्या, न्याय्य हक्क आणि सामाजिक सुरक्षेसाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देशव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शासनाचे लक्ष कामगारांच्या विविध प्रश्नांकडे वेधले.

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलनाद्वारे २८ महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताचे माननीय पंतप्रधान, केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.

कामगारांच्या प्रमुख मागण्या

भारतीय मजदूर संघाने कामगारांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारसमोर पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत—

1. EPF अंतर्गत किमान पेन्शन ₹१,००० वरून ₹७,५०० प्रतिमहिना करण्यात यावी.
2. EPF वेतन मर्यादा ₹१५,००० वरून ₹३०,००० करण्यात यावी.
3. बोनस पात्रतेची वेतन मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करण्यात यावी.
4. कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना ‘समान काम–समान वेतन’ या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
5. कामगारविरोधी तरतुदी रद्द अथवा आवश्यक त्या सुधारणा करून कामगारहिताचे संरक्षण करावे.
6. देशातील सर्व कामगारांसाठी किमान वेतन ₹३०,००० प्रतिमहिना निश्चित करावे.
7. राज्यातील कंत्राटी कामगारांना हरियाणा सरकारच्या धर्तीवर नोकरीमध्ये संरक्षण द्यावे.
8. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत समान वेतन द्यावे.
9. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित मानधन तात्काळ अदा करावे.

५०० ते ६०० कामगारांचा सहभाग

चंद्रपूर जिल्ह्यातील या आंदोलनाला कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक उपक्रम, बँकिंग, विमा, संरक्षण, वीज, रेल्वे, कंत्राटी कामगार तसेच विविध उद्योग व आस्थापनांमधील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारतीय मजदूर संघाशी संलग्न २२ संघटनांचे पदाधिकारी व सदस्य आंदोलनात उपस्थित होते. एकूण ५०० ते ६०० कामगार व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचे संघटनेने सांगितले.

आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मुंजे, सुधीर घुरडे, विवेक आलेवार, अनिल बंडेवार, संजय बोथे, मंडळ महावितरणचे ताजने गोरें, सुरवणी बोथे मंडळ तसेच आंदोलनाचे नियोजन करणारे चंद्रपूर जिल्हा भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष बंडू हिरवे व जिल्हा मंत्री पवन ढवळे यांनी परिश्रम घेतले.

कामगारांच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये