चंद्रपूरच्या विकासकामांना गती देण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
रिंग रोडसह रेल्वे पुलाचे रुंदीकरण, रस्ते विकास, नझूल पट्टे, माईन टुरिझम आणि विविध प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना गती देण्यासोबतच प्रलंबित प्रश्नांचा प्रभावीपणे निपटारा करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आढावा बैठक घेतली. शहर आणि ग्रामीण भागातील सुरू, मंजूर तसेच प्रस्तावित विकासकामांची अद्ययावत माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. चंद्रपूरच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत सातत्याने समन्वय ठेवून काम केले जात असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, शिक्षणाधिकारी सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता पूनम वर्मा, मनपा शहर अभियंता रवींद्र हजारे, महावितरणचे कार्यकारी अभियंता दार्वेकर, उपअभियंता खेळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील राठोड यांच्यासह शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष अशोक जीवतोडे, सूर्यकांत खणके, विकास, महाथेरो डॉ. सुमनवन्नो, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, नामदेव डाहुले, नगरसेवक भालचंद्र दाणव, रॉबिन बिश्वास, जितेश कुळमेथे, आशा देशमुख, नितेश गवळी आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला शहराच्या भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या चंद्रपूर रिंग रोडच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती वाहतूक लक्षात घेता रिंग रोड प्रकल्पाला गती मिळणे आवश्यक असल्याचे आ. जोरगेवार यांनी स्पष्ट केले. यासोबतच प्रियदर्शिनी चौक ते मध्यवर्ती बसस्थानक रेल्वे पुलाचे रुंदीकरण तसेच नवीन पुलाच्या बांधकामाबाबतही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्ते विकासकामांवरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. सुरू असलेली, मंजूर झालेली तसेच पूर्णत्वास आलेली रस्त्यांची कामे कोणत्या टप्प्यावर आहेत, त्यातील अडचणी कोणत्या आहेत आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याची माहिती आ. जोरगेवार यांनी घेतली. विकासकामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये आणि नागरिकांना त्याचा वेळेत लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी नझूल जमिनींच्या पट्टे वाटपाचा तसेच प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. अनेक नागरिकांची प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित असून, त्यांचा नियमानुसार जलदगतीने निपटारा करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी भूमिका आ. जोरगेवार यांनी मांडली. यासोबतच शहरातील महत्त्वपूर्ण मंदिरांना सुधारित दर्जा देण्याच्या प्रस्तावाचाही आढावा घेण्यात आला.
चंद्रपूरच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने प्रस्तावित विपश्यना केंद्र तसेच बंद पडलेल्या खाणींच्या ठिकाणी ‘माईन टुरिझम’ आणि इको-पार्क विकसित करण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा झाली. चंद्रपूरला औद्योगिक शहरासोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही सक्षम ओळख निर्माण करून देण्यासाठी उपलब्ध ऐतिहासिक, नैसर्गिक आणि औद्योगिक वारशाचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक असल्याचे आ. जोरगेवार यांनी सांगितले.
शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत खांब नागरिकांसाठी अडचणीचे ठरत असल्याने, त्यांचे स्थलांतर करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि रस्त्यांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांबांचे स्थलांतर तातडीने करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय रयतवारी कॉलरी ते महाकाली कॉलरी परिसरातील रस्ता रुंदीकरण, तसेच चंद्रपूर बसस्थानक–रेल्वे स्टेशन–महाकाली कॉलरी–चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन या ३.१० किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण व सुधारणा या महत्त्वपूर्ण कामांचाही आढावा घेण्यात आला. या मार्गावरील वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता कामांना आवश्यक ती गती देण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले.
शैक्षणिक संस्थांवरील मालमत्ता कर आणि संलग्न करमाफीच्या विषयावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शैक्षणिक संस्थांवरील कराचा प्रश्न, त्याचा विद्यार्थ्यांवर आणि संस्थांच्या कामकाजावर होणारा परिणाम याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.
चंद्रपूर मतदारसंघातील प्रत्येक महत्त्वपूर्ण विकासकाम वेळेत पूर्ण व्हावे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा प्रभावीपणे निपटारा व्हावा, यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच ग्रामीण भागातील विकासकामांनाही समान प्राधान्य दिले जात आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने ही आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरली.



