शाळा इमारतीच्या निकृष्ट बांधकामावर ग्रामस्थांचा एल्गार
चिवंडा येथील शाळेचे बांधकाम सहा महिन्यांपासून रेंगाळलेले ; गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिंपरी :- तालुक्यातील चिवंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी सुरू असलेल्या दोन मजली नवीन इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता, प्रगती आणि सुरक्षिततेबाबत शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थ्यांचे पालक व गावातील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या बांधकामाची सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांमार्फत तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी, पंचायत समिती गोंडपिंपरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन १८ फेब्रुवारी २०२६ रोजी झाले. मात्र, भूमिपूजनाला सहा महिने उलटूनही अद्याप फाउंडेशनचे काम पूर्ण झालेले नसल्याने बांधकामाची प्रगती अत्यंत संथ असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट, खडी, वाळू व अन्य साहित्य अपेक्षित तांत्रिक दर्जाचे आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बांधकामाच्या काही भागांत भेगा पडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नवीन इमारतीचे काम अपूर्ण असल्याने सध्या इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग एकाच खोलीत घेण्याची वेळ आली आहे. त्यातच शाळेची जुनी इमारत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने बांधकामाचे मंजूर अंदाजपत्रक, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, मंजूर आराखडा, कामातील विविध घटकांची माहिती, वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याचा तांत्रिक दर्जा, मंजूर किंमत व काम पूर्ण करण्याची कालमर्यादा यासह कंत्राटदाराची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच मोजमाप पुस्तिकेतील (MB) संबंधित नोंदी आणि आतापर्यंतची बिले व देयकांची माहितीही लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तांत्रिक चौकशी करून पाहणीचा लेखी अहवाल शाळा व्यवस्थापन समितीस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनकर्ते विनोद चांदेकर, वर्षा सोयाम, सुनीता आत्राम, रोहिणी आत्राम, प्रतिमा आत्राम, गोपीनाथ आत्राम, संन्याशी मडावी, नानाजी सिडाम, पुणेश आत्राम, सुभाष मडावी, विनोद टेकाम यांच्यासह चिवंडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करा
बांधकामाची तातडीने तांत्रिक तपासणी करून साहित्याच्या गुणवत्तेची चाचणी करावी, बांधकामातील भेगांची कारणे निश्चित करावीत आणि आतापर्यंत झालेल्या कामाचा लेखी अहवाल तयार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच बांधकाम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी वर्गव्यवस्था करावी आणि जुन्या इमारतीच्या गळतीची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.



