पोलीस स्टेशन गिरडतर्फे ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘ड्रग्ज फ्री वर्धा’ मोहीम
रस्ते सुरक्षा जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन गिरड यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठाणेदार विकास गायकवाड तसेच पोलीस उपनिरीक्षक गोमेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ‘ड्रग्ज फ्री वर्धा’ (नशामुक्त वर्धा) मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृती आणि रस्ते सुरक्षा नियमांच्या प्रसारासाठी भव्य रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये परिसरातील विविध शाळांतील सुमारे २०० ते २५० विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी हातामध्ये अमली पदार्थ विरोधी व वाहतूक नियमांच्या जनजागृतीचे फलक धरून नागरिकांना जनजागरणाचा संदेश दिला.
वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन व्हावे आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला प्राधान्य मिळावे या उद्देशाने, या कार्यक्रमादरम्यान ठाणेदार विकास गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक गोमेज पाटील आणि पोलीस स्टेशन मधील अंमलदार यांच्या हस्ते एकूण १०० नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे आणि नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.



