ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत अवैध दारू-सट्ट्याचा सुळसुळाट : कारवाईचा बडगा मात्र पानटपरीवाल्यांवर

नवसागर, गुळ-मोहाच्या व देशी विषारी दारूला पुन्हा उधाण : पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्री, सट्टा व जुगाराच्या व्यवसायाला पुन्हा उधाण आल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील विविध वॉर्ड, गल्ली-बोळ, चौक तसेच महामार्गालगत अवैध धंदे सुरू असल्याचे आरोप होत असताना, या गंभीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पानटपरी व्यावसायिकांवरच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यात अवैध व घातक पदार्थांबाबत कारवाया सुरू असताना, भद्रावती शहरातील परिस्थितीकडे संबंधित यंत्रणेचे पुरेसे लक्ष आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

*नवसागर, गुळ-मोहाच्या तसेच देशी विषारी दारूला पुन्हा उधाण?*

भद्रावती शहरात पूर्वी नवसागर, गुळ-मोहा आदींपासून तयार होणाऱ्या कथित व देशी विषारी दारूच्या विक्रीला आळा बसला होता. मात्र आता काही भागांत पुन्हा अशा प्रकारच्या दारूच्या व्यसनाला उधाण आल्याची चर्चा आहे. या दारूमुळे यापूर्वी अनेकांचे जीव गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ अवैध व्यवसायाचा नसून मानवी जीवाशी संबंधित अत्यंत गंभीर प्रश्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

“अशा प्रकारची विषारी दारू विक्री सुरू असल्याचे पोलिसांना दिसून येत नाही का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या आरोपांची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती तपासावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

*अवैध दारू-सट्ट्याकडे दुर्लक्ष, पानटपरीवर कारवाई?*

नव्याने रुजू झालेल्या परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडून शहरातील पानटपरी व्यावसायिकांच्या दुकानांवर धाडी टाकून दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असले तरी शहरात खुलेआम सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारू, सट्टा-जुगाराच्या अड्ड्यांवरही त्याच ताकदीने कारवाई होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

*रस्त्यावर भंगार व्यवसाय; वाहतुकीलाही अडथळा*

शहरातील अनेक ठिकाणी रहदारीच्या रस्त्यालगत भंगार व्यवसाय सुरू असल्याचे प्रकारही निदर्शनास येत आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. या प्रकारांकडेही संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.

*कारवाई सर्वांवर समान असावी*

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे; मात्र कारवाई करताना कोणताही भेदभाव नसावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पानटपरी व्यावसायिकांवर कारवाई होत असेल, तर त्याचवेळी अवैध दारू विक्री, सट्टा-जुगार आणि रस्त्यावरील अतिक्रमणासह भंगार व्यवसायावरही ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

विशेषतः विषारी दारूमुळे पूर्वी जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. भद्रावतीत पुन्हा अशा दारूचा फैलाव होत असल्याच्या तक्रारी खऱ्या असतील, तर संभाव्य दुर्घटना घडण्याची वाट न पाहता पोलिस व संबंधित विभागांनी तातडीने तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अवैध दारू-सट्ट्याला अभय कोणाचे? कारवाईचा हात केवळ छोट्या व्यावसायिकांपर्यंतच का? आणि विषारी दारूचा कथित फैलाव पोलिसांच्या नजरेतून कसा सुटतो? या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित प्रशासनाने द्यावीत, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये