ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. मनीष सिंग यांचा स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट आरोग्यसेवेसाठी सन्मान

ग्रामीण रुग्णालयात विविध शस्त्रक्रिया सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून दिल्याबद्दल गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय, भद्रावतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष कृष्णकुमार सिंग यांना उल्लेखनीय आरोग्यसेवेसाठी सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सकाळी ९.०५ वाजता झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते डॉ. सिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर सोनारकर,जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची उपस्थिती होती.

      ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असताना डॉ. सिंग यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना विविध शस्त्रक्रिया व आवश्यक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मोठ्या शहरांतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाण्याची वेळ ग्रामीण रुग्णांवर येऊ नये, यासाठी त्यांनी ग्रामीण रुग्णालयातूनच आवश्यक शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

    त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णालयात हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिसेक्टमी, फिशर, हेमोरॉइड्स यांसह विविध किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच स्त्री व पुरुषांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना वेळेत, सुलभ आणि स्थानिक पातळीवर उपचार मिळण्यास मदत झाली.

     कुटुंब नियोजनाच्या विविध उपक्रमांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे तसेच विविध आरोग्य उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यातही त्यांनी योगदान दिले आहे.

          ग्रामीण रुग्णालयातील मर्यादित सुविधांचा प्रभावी वापर करून गरजू रुग्णांना स्थानिक पातळीवर आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.

      डॉ. मनीष सिंग यांच्या या गौरवामुळे भद्रावतीच्या ग्रामीण आरोग्यसेवेला राज्यस्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या सन्मानाबद्दल आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, सहकारी तसेच भद्रावती परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये