ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीच्या भूमिपुत्रांना गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी!

ॲड. सचिन फुलझेले, कमलेश निमगडे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा प्रभारीपदी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील दोन भूमिपुत्रांना काँग्रेस पक्षाने जिल्हास्तरीय संघटनात्मक जबाबदारी सोपवून राजकीय क्षेत्रात नवी संधी दिली आहे. ॲड. सचिन फुलझेले आणि कमलेश निमगडे यांची गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे गोंडपिपरी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक कार्यकर्त्यांकडून दोघांचे अभिनंदन केले जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने विविध स्तरांवर पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत. पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, कार्यकर्त्यांना संघटित करणे, सामाजिक प्रश्नांना पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटन सज्ज करणे, या उद्देशाने नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

याच प्रक्रियेत गोंडपिपरी तालुक्यातील ॲड. सचिन फुलझेले आणि कमलेश निमगडे यांच्यावर गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नव्या नियुक्तीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासह कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे, पक्षाच्या धोरणांचा प्रचार-प्रसार करणे आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

गोंडपिपरीसारख्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना जिल्ह्याच्या सीमापलीकडे संघटनात्मक जबाबदारी मिळणे ही तालुक्यासाठी गौरवाची बाब ठरत आहे. या नियुक्तीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासह काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निवडीबद्दल आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर, काँग्रेस नेते किशोर वडेट्टीवार यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये