विश्वशांती विद्यालयात ‘सुरक्षित बचपन अभियान’ व ‘बालविवाह मुक्त भारत’ शिबिर उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’ आणि ‘बालविवाह मुक्त भारत’ या अत्यंत महत्त्वाच्या व संवेदनशील विषयांवर एकदिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक साक्षरता वाढवणे, बालकांचे हक्क व सुरक्षितता अबाधित राखणे आणि समाजातील बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेला आळा घालणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस.मुप्पावार हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता स्वतःचे हक्क, कर्तव्य आणि कायद्याची माहिती करून घेणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावली बार असोसिएशनचे अधिवक्ता ॲड. गणेश ठिकरे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारे कायदे तसेच सुरक्षित बालपणासाठी आवश्यक असलेल्या विविध तरतुदींची त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. बालविवाहामुळे मुला-मुलींच्या शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक विकासावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत, अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर मदत व प्रशासनाची मदत कशी घ्यावी, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवा समितीचे दिलीप फुलबांधे ,ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस, किशोर संगीडवार, राजश्री बिडवई आणि जिल्हा परिषद शाळा, सिंगापूरचे मुख्याध्यापक शेख परवेज, जी. प.मुख्याध्यापक परमानंद जेंगठे , ऋषीदेव चौधरी यांची उपस्थिती होती.
या एकदिवसीय शिबिरास विद्यालयातील ५ वी ते १२ वी चे बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उच्च माध्यमिक शिक्षक राजू केदार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक महेश देहारकर यांनी मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.


