ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय संविधान दिन _ समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी आणखी लढा उभारला जावा!

सामाजिक कार्यकर्ते अॅड विनोद बोरसे यांचे मत

चांदा ब्लास्ट

समाजातील पीडित घटकांच्या सक्षमीकरणासाठी आणखी प्रयत्न व्हावेत! _ अॅड विनोद बोरसे 

चंद्रपूर : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांना बलीदान द्यावे लागले आहे, तेव्हा कुठे आपण पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊ शकलो आहोत.त्यामुळे देशभक्त व स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेतले जावे. संविधान लागू होऊन आज ७५ वर्षेपेक्षा अधिक काळ होऊन देखील आज सुध्दा दऱ्याखोऱ्यातील, दुर्गम, जंगल व्याप्त, पहाडी भागातील नागरिक मुलभूत गरजा आणि मुलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत.त्यामुळे अशा वंचित घटकांच्या हक्कांसाठी आणखी लढा उभारला जावा तसेच समाजातील पीडित घटकांच्या सक्षमीकरणासाठी आणखी प्रयत्न व्हावेत असे मत चंद्रपूर येथील एकोरी वार्डातील सामाजिक कार्यकर्ते अॅड विनोद बोरसे यांनी व्यक्त केले.

      भारतीय संविधान दिनानिमित्त आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना अॅड विनोद बोरसे बोलत होते.

काय आहे संविधान दिन?

भारतीय संविधान सभेने दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ पासून राज्यघटना स्वीकारली आहे.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

समस्या मुक्त होऊ शकतो काय?

दुर्गम भागात पावसाळ्यात दळणवळण व इतर सुविधांअभावी अनेक गर्भवती महिलांचे हाल होत असतात, नदी – नाले यावर पुल नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहता येत नाही. कित्येक गावात आजही स्मशानभूमी, दफन भुमी अभावी इतर ठिकाणी अंत्यविधी करावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक पहाडी भागात वीज व एस टी बस पोचली नाही ही शोकांतिका नव्हे काय? या समस्यांमधुन मुक्त होता येईल काय? असा सवाल उपस्थित करून संविधानाचा जागर करताना या समस्यांवर देखील विचारमंथन होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे अॅड विनोद बोरसे यांनी यावेळी सांगितले.

    या वंचित घटकांच्या हक्कांचे काय?

  समाजातील महिला,बालके, जेष्ठ नागरिक यांना आजदेखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.रेशनकार्ड आणि आधार कार्ड सारख्या विविध वैयक्तिक कागदपत्रांसाठी शासन दरबारी चकरा मारणे थांबलेले नाही. लोकशाही व्यवस्थेत नागरीकांच्या संविधानिक हक्कांचे संरक्षण होऊन, वंचित घटकांना वेळेवर सवलती मिळणे आवश्यक आहे.त्यासाठी संबंधित यंत्रणेने कायद्याची अंमलबजावणी करताना लोकांप्रती जबाबदेही असणे आवश्यक आहे.

    रस्त्यावर निवाराहिन फिरणाऱ्या मनोरुग्णांचे काय ?

आजही तळागाळातील लोकांपर्यंत संविधानाची माहिती पोहोचलेली नाही.संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार बहाल केलेला आहे.मनोरूग्णांना देखील त्यांचे हक्क व अधिकार आहेत.मात्र आजही रस्त्यावर निवाराहिन स्थितीत फिरणाऱ्या मनोरुग्णांची समस्या समुळ नष्ट होऊ शकली नाही अगर या पीडित घटकाला आवश्यक त्या आरोग्य व संरक्षणाच्या सुविधा सक्षमपणे देऊ शकलो नाहीत.ही वास्तवता आहे.त्यामुळे प्रशासनाने अशा वंचित घटकांसह सामान्य नागरिकांचे हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणखी आवश्यक त्या उपाययोजना आखुन हक्कांची पुर्तता जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने संविधानाचा जागर यशस्वी झाला असे म्हणता येईल असे देखील अॅड विनोद बोरसे यांनी सांगितले.

    वंचित घटकांना अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे तर सामान्य नागरिकांना आरोग्याच्या किफायतशीर उपचाराच्या योजना मिळण्यासाठी झटावे लागत आहे.नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी निर्णय घेतले पाहिजेत.तेव्हा कुठे संविधानाने सामान्य नागरिकांना दिलेल्या हक्कांची पुर्तता झाली असे म्हणता येईल असे देखील अॅड विनोद बोरसे यांनी संविधान दिनानिमित्त बोलताना सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये