मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रिशताब्दी महोत्सवाचे निमंत्रण
मोहननाथमहाराज पैठणकर यांनी रामगिरी निवासस्थानी घेतली भेट; बोधचिन्ह व तुलसीवृक्ष देऊन केला सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीक्षेत्र देऊळगावराजा येथील श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थानचे पीठाधीश प.पू. श्री. मोहननाथमहाराज पैठणकर यांनी नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वसंत पंचमी, दि. ११ फेब्रुवारी २०२७ रोजी श्रीक्षेत्र देऊळगावराजा येथे आयोजित श्रीसंत नरहरिनाथमहाराज त्रिशताब्दी जयंत्युत्सव, प्रथम पदवीदान समारंभ व जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले.
या महोत्सवाला माननीय सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांची उपस्थिती लाभणार आहे. वैदिक व वारकरी अध्ययन परंपरेतील या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने संस्थानच्या वतीने विविध धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी पूज्य मोहननाथमहाराज पैठणकर यांनी महोत्सवाचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) आणि तुलसीवृक्ष भेट देऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा सन्मान केला.



